
खोपोली सारख्या औद्योगिक शहराने आजवर अनेक हिरे देशाला दिले आहेत, पण त्यातला सर्वात लख्ख चमकणारा हिरा म्हणजे कौसर सय्यद (मुल्ला). २००७ साली जेव्हा त्या रायगड जिल्हा पोलीस दलात भरती झाल्या, तेव्हा त्यांनी केवळ खाकी गणवेश परिधान केला नव्हता, तर खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजासाठी एक नवा इतिहास रचला होता. त्या तालुक्यातील पोलीस दलात रुजू होणाऱ्या मुस्लिम समाजातील पहिली महिला ठरल्या.
कौसर सय्यद यांनी केवळ पोलीस दलात नोकरी केली नाही, तर आपल्या कर्तृत्वाने स्वतःची एक वेगळीच ओळख निर्माण केली. २०२२ साली त्यांची निवड अमेरिकेतील ‘इंडियन एम्बेसी’मध्ये (भारतीय दूतावास) करण्यात आली. विशेष म्हणजे, संपूर्ण महाराष्ट्रातून निवड झालेल्या त्या एकमेव महिला अधिकारी होत्या. ही बाब केवळ खोपोलीसाठी नाही, तर संपूर्ण राज्यासाठी अभिमानास्पद आहे. येणाऱ्या काळात राष्ट्रपतींच्या हस्ते त्यांचा सत्कार होणार आहे, हे ऐकून मन अभिमानाने भरून येतो.
एक विदारक वास्तव आणि खंत
कौसर यांच्या रूपाने समाजाने एक आदर्श निर्माण केला असला तरी, एक दाहक सत्य समोर आले आहे. २००७ पासून आजपर्यंत, म्हणजेच गेल्या १८ वर्षांत, खालापूर तालुक्यातील मुस्लिम समाजातील एकही मुलगा किंवा मुलगी पोलीस दलात भरती होऊ शकला नाही. कौसर सय्यद यांनी जी वाट दाखवून दिली, त्या वाटेवर चालणारे पाय कुठे हरवले? हा प्रश्न आज समाजाला विचारण्याची वेळ आली आहे.
सर्वात मोठी खेदजनक बाब म्हणजे, ज्या कन्येने सातासमुद्रापार भारताचा तिरंगा फडकवला, ज्या मुलीच्या कर्तृत्वाची दखल केंद्र सरकार आणि राष्ट्रपती घेणार आहेत, त्या कौसर यांचा खोपोलीतील मुस्लिम समाजाने साधा जाहीर सत्कारही करू शकत नाही का ?
”घरचा हिरा जगाला प्रकाश देतोय, पण घरालाच त्याचे कौतुक नसावे, यासारखी दुर्दैवी गोष्ट दुसरी नाही.”
आता तरी जागे होऊया!
समाजाने केवळ धार्मिक किंवा राजकीय कार्यक्रमातच एकत्र न येता, शैक्षणिक आणि प्रशासकीय यश संपादन करणाऱ्या आपल्या लेकी-बाळांचे कौतुक करायला हवे. जर आपण आपल्या यशस्वी माणसांचा सन्मान केला नाही, तर येणारी पिढी मोठी स्वप्ने पाहनार नाही.
कौसर सय्यद ही केवळ एक पोलीस अधिकारी नाही, तर ती एक ‘क्रांती’ आहे. खोपोलीच्या मुस्लिम समाजाने त्यांच्या कर्तृत्वाचा गौरव करून तरुण पिढीसमोर एक आदर्श ठेवण्याची गरज आहे. कौसर सय्यद आम्हाला तुमचा सार्थ अभिमान आहे! तुमची ही गरुडझेप अशीच कायम राहो.