
कोंढवा राष्ट्रवादी काँग्रेसचा बालेकिल्ला. जिथे नावाला देखील काँग्रेस शिल्लक राहिली नव्हती. सत्तेत राष्ट्रवादी काँग्रेसचे नगरसेवक. लोकसभा व विधानसभा निवडणुकीत या भागात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला भरभरून मुस्लिम बहुल भागातून मते मिळाली.
पण अजित पवार समर्थक संग्राम जगताप यांच्या विखारी व विषारी भाषणाची दखल येथील मतदार घेत होता परिणामी अजित पवार गट व शरद पवार गट एकत्र आल्याने मुस्लिम बहुल भागात दोन्ही राष्ट्रवादी विरोधात वातावरण तयार होते. प्रशांत जगताप यांच्या राजकीय दृष्ट्या वैचारिक भूमिकेची दखल येथील मतदारांनी घेतली. कमी कालावधीत काँग्रेसमध्ये प्रवेश केला. याचा परिणाम कोंढवा, वानवडी, कॅम्प परिसर, येरवडा या टप्प्यात पाहायला मिळाला या पट्ट्यात काँग्रेस पुन्हा जिवंत झाली.
कोंढव्यात SDPI Social Democratic party of India चे प्रदेशाध्यक्ष अजहर भाई तांबोळी यांनी काँग्रेसशी युती करण्याचा व काँग्रेसच्या चिन्हावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला. कोंढव्यात प्रत्येक सुख दुःखाच्या प्रसंगी आक्रमकपणे उभा राहणारा कार्यकर्ता वर्ग असलेल्या SDPI पक्षाच्या आक्रमक प्रचार यंत्रणेचा फायदा परिणामी काँग्रेसला झाला. आक्रमक प्रचार, नियोजन याबाबतीत दक्षिण भारतातील राजकारणात चुणूक दाखवणारा हा पक्ष काँग्रेसच्या विजयातील धुरंधरच!
कोंढवाभागात युवा वर्गात लोकप्रिय असलेले मोहसीनभाई शेख यांनी घेतलेली प्रशांत जगताप यांच्याबरोबर घेतलेली सरळ राजकीय भूमिका देखील मतदारांना भिडली.
SDPI व काँग्रेसयुतीचे उमेदवार ताज सिद्दिकी यांच्या मातोश्री यांना हरवून’ काम बोलता है! ‘ हि टॅगलाईन घेऊन आलेले हाजी गफूर पठाण यांच्या विजयाने ‘ गड आला पण सिंह ‘ अशी परिस्थिती काँग्रेस आणि सोशल डेमोक्रॅटिक पक्षाची झाली आहे.
मुस्लिम बहुल भागातून निवडून येणारे साईनाथ बाबर यांचा पराभव हा त्यांची विकासकामे पाहता धक्कादायक आहे. येणाऱ्या काळात त्यांना राजकीय दृष्ट्या मनसेचा बालेकिल्ला मजबूत करण्यासाठी पुन्हा नव्याने तयारी करावी लागेल.
राष्ट्रवादी काँग्रेसचे हाजी गफूर पठाण निवडून आले असले तरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या वानवडी हडपसर विधानसभा मतदारसंघाला महानगरपालिकेच्या निकालाने खिंडार पडले आहे हे सिद्ध होते.
संग्राम जगताप यांच्या विखारी प्रचाराने व राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुटप्पी राजकीय भूमिकेमुळे मुस्लिम बहुल भागात राष्ट्रवादीच्या दुरावलेल्या मतदारांनी काँग्रेस आणि AIMIM कडे भाकरी फिरवली का?