
शहरातील एका गरीब कुटुंबातील मोहम्मद काशिफ गुलाम रब्बानी याने सात वर्षांच्या सातत्यपूर्ण मेहनत आणि जिद्दीने चार्टर्ड अकाउंटंट (सीए) परीक्षा यशस्वीरीत्या उत्तीर्ण केली आहे. आर्थिक परिस्थिती बिकट असतानाही काशिफने आपले स्वप्न साकार करण्यासाठी अथक परिश्रम घेतले.
काशिफ यांना त्यांच्या वडिलांचा आणि मार्गदर्शक ॲडव्होकेट ज्यूबर शेख यांचा सातत्याने पाठिंबा मिळाला. त्यांनी पुण्यातील एका चार्टर्ड अकाउंटंट फर्ममध्ये काम करत असताना, उर्वरित वेळेत धुळे येथील आसिम खान स्टडी सेंटरमध्ये अभ्यासाला वाहून घेतले. त्यांच्या या यशस्वी प्रवासात स्टडी सेंटरने महत्त्वपूर्ण भूमिका बजावली.
आसिम खान स्टडी सेंटरच्या संचालकांनी काशिफ यांचे मन:पूर्वक अभिनंदन केले असून, त्यांचा सत्कार सेंटरमध्ये आयोजित एका छोटेखानी समारंभात करण्यात आला. काशीफ सोबत त्याचे वडिलांचा सुद्धा सत्कार करण्यात आला. यांच्या या यशाने केवळ त्यांच्या कुटुंबालाच नव्हे, तर संपूर्ण धुळे शहराला अभिमान वाटत आहे. त्यांनी आर्थिक अडचणींवर मात करत मिळवलेले हे यश इतर तरुणांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.